औरंगाबाद – रेल्वेस्थानकाची सुरक्षितता किती ढिसाळ आहे आणि रेल्वे पोलिसांचे प्लॅटफॉर्मवरील सुरक्षिततेकडे किती दुर्लक्ष्य आहे, याचा अद्भूत नमुना ५ डिसेंबरच्या मध्यरात्री दिसून आला. रेल्वेस्थानकात एक बुलेटस्वार घुसल्याचे वृत्त शुक्रवारी (ता. ७) 'सांजवार्ता ऑनलाईन'ने प्रकाशित केल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि या बातमीवरुन तपास सुरु झाल्यानंतर रेल्वेस्थानकात एक नव्हे तर दोन दुचाकी घुसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले.
'सांजवार्ता ऑनलाईन'च्या बातमीनंतर रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने कारवाई करत स्थानकात घुसलेल्या चौघांचा शोध घेतला आणि त्यांना सात हजार रुपये दंड ठोठावला आहे. हे चारही तरुण दोन बाईकवरुन रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यासोबतच त्यांच्यासोबत आणखीही काही तरुण असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही.
... हे होते रेल्वे स्टेशनमध्ये घुसणारे तरुण
बाईकवरती स्टंट करण्याची सध्या तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र त्यांच्या या स्टंटबाजीमुळे कोणाचा जीवही धोक्यात येऊ शकतो याकडे त्यांचे सर्रास दुर्लक्ष्य होताना दिसते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्टंट करण्यासाठी गेलेले चारही तरुण 20 ते 22 वयोगटातील आहेत. यातील महेंद्र अशोक खोतकर (20), महेंद्र विजय सोनवणे (22), सागर सुधाकर राऊत (20) हे तिघेही भडकल गेट येथील आनंद बुद्धविहार येथील रहिवासी आहेत. चौथा तरुण सुमित रत्नाकर वेलदोडे (28) हा नारळीबाग येथील रहिवासी असल्याची माहिती रेल्वे सुरक्षाबलाचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी सांजवार्ता ऑनलाईनला दिली.








